बांदिवडे-भगवंतगड खार बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार; उपोषण यशस्वी

३१ ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेचे लेखी आश्वासन; मागणी पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उतरून आंदोलनाचा इशारा

आचरा (प्रतिनिधी) : बांदिवडे-भगवंतगड खार बंधाऱ्याच्या प्रलंबित मागणीसाठी बांदिवडे ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी भगवंतगड बंधारा येथे केलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण अखेर यशस्वी ठरले. खारभूमी विकास विभागाकडून ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खार बंधाऱ्याच्या मागणीला आता निर्णायक वळण मिळाले आहे.कालावल खाडीला योग्य क्षमतेचा खार बंधारा नसल्याने भरतीच्या वेळी खारे पाणी थेट शेतजमिनीत शिरत आहे. परिणामी बांदिवडे, चिंदर आणि त्रिंबक परिसरातील हजारो एकर सुपीक शेती नापीक होण्याच्या मार्गावर आली आहे. खाऱ्या पाण्याचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित नसून उन्हाळ्यात परिसरातील विहिरींचे पाणीही खारट होत असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे.शेती करणे दिवसेंदिवस अशक्य होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या रोजगाराचे साधन हिरावले जात असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण केले.आश्वासनानंतर आंदोलनाला स्थगितीउपोषणस्थळी खारभूमी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. बांदिवडे खारभूमी योजनेच्या नूतनीकरणाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आले असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत या कामाला प्रशासकीय मान्यता प्राप्त करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन खारभूमी विकास उपविभाग, कणकवलीचे उपविभागीय अधिकारी सचिन चव्हाण यांनी दिले.

प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, असेही लेखी आश्वासनात स्पष्ट करण्यात आले आहे. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.राजकीय पदाधिकाऱ्यांची मध्यस्थीभाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. खार बंधाऱ्याच्या प्रश्नासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये समन्वयाची भूमिका बजावत उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.‘३१ ऑक्टोबरनंतर खाडीपात्रात उतरू’सरपंच अनंत ऊर्फ आशू मयेकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, आनंद परब आणि किरण पवार यांनी खार पाण्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यावर निर्माण झालेल्या संकटाची माहिती दिली. दरम्यान, ३१ ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही, तर ग्रामस्थ पुढील आंदोलन थेट खाडीपात्रात उतरून करतील, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.उपोषणस्थळी सहायक अभियंता स्वप्नील होडावडेकर, कनिष्ठ अभियंता अमीर जोशी, आचरा पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले, उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई उपस्थित होते. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.यावेळी चिंदर सोसायटी अध्यक्ष देवेंद्र हडकर, बांदिवडे सोसायटी अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, संतोष गावकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री, विनायक गावकर, अंजली घाडीगावकर, उदय सावंत, किरण सावंत, बबन मांजरेकर, महेश हडकर, लीलाधर मुणगेकर, संतोष मुणगेकर, सोनू सावंत, सुभाष परब, रंजन प्रभू, पांडुरंग मुणगेकर, सुभाष मुणगेकर, अनिल आसोलकर, बला मुणगेकर, बबन मुणगेकर, सत्यवान मुरकर, बाळा मुरकर, नीता सावंत, शाहूलखन बांदिवडेकर, शामसुंदर प्रभू, संतोष आचरेकर, ओमकार मुरकर, प्रकाश परुळेकर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, संदेश पवार, ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा फणसेकर, चंद्रकांत राणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!