पाककला स्पर्धेत रत्ना लब्दे यांच्या शेवग्याच्या घारग्यांना प्रथम क्रमांक
माळगाव येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा (प्रतिनिधी) : निसर्गाने मानवाला मोफत दिलेला आणि औषधी गुणांनी समृद्ध असलेला रानभाज्यांचा खजिना जपणे ही काळाची गरज आहे. रानभाज्यांमध्ये रासायनिक खतांचा वापर नसल्याने त्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या निसर्गदत्त भाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देतानाच त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, उमेद आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने माळगाव हायस्कूल सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला नागरिक, महिला व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, माळगाव सरपंच चैताली साळकर, मठबूद्रूक सरपंच मोहन वेंगुर्लेकर, वडाचापाट सरपंच सोनिया प्रभूदेसाई, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, वेरळ सरपंच धनंजय परब, शेतकरी सल्ला समिती मालवण अध्यक्ष प्रताप चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रविंद्र पाटील, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, माळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय खोत, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर, ग्राम अधिकारी युगल प्रभूगावकर, मंडळ कृषी अधिकारी पोईप श्रीपाद चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी आचरा संचिता फाळके, निधी मूणगेकर, उपसरपंच शशिकांत सरनाईक, अरुण भोगले, संस्था सचिव हेमंत हडकर, उद्योजक दयानंद देसाई, आत्मा समिती सदस्य सानिका मूळे, शंकर गावडे, मुख्याध्यापक रवळू बेनके आदी उपस्थित होते.पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी फास्ट फूडचे शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेता महिलांनी आहारात रानभाज्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले. डॉ. संजय खोत यांनी पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन करत निसर्गाचे संवर्धन करून तो निरंतर टिकविण्याची गरज व्यक्त केली. दीपक चव्हाण, प्रताप चव्हाण आणि अरुण भोगले यांनीही मार्गदर्शन केले.पाककला स्पर्धेतील विजेतेमहोत्सवानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत माळगावच्या रत्ना राजेश लब्दे यांनी शेवग्याचे घारगे बनवून प्रथम क्रमांक पटकावला. चांदेरच्या नमिता महेश मूळीक यांनी टाकळा लाडू या पदार्थासाठी द्वितीय, तर खेरवंदच्या अर्चना अतुल जोशी यांनी कूड्याच्या शेंगाची भाजी व चटणीसाठी तृतीय क्रमांक मिळविला.उत्तेजनार्थ पारितोषिक कुमामे येथील गौरव गणेश मूणगेकर यांच्या कूर्डू रोलला, तर वडाचापाट येथील निकीता मंगेश पाताडे यांच्या उंबराच्या फळाच्या भाजीला देण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण रानभाजी तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे व आरती कांबळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांनी केले.













