कळसुली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या वतीने कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशालेतील इ. ५वी ते इ. १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपत्तीवेळी स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा या संदर्भात प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सीपीआर (CPR) कधी व कसा द्यावा, एखाद्या व्यक्तीला दुखापत होऊन रक्तस्राव होत असल्यास प्रथमोपचार म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आग, भूकंप आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. आग लागल्यास धूरापासून बचाव करण्यासाठी खाली वाकून हालचाल करणे, गॅस किंवा विद्युत उपकरणे त्वरित बंद करणे आणि सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भूकंपाच्या वेळी “ड्रॉप, कव्हर आणि होल्ड” म्हणजेच खाली बसणे, डोकं झाकणे आणि सुरक्षित ठिकाणी थांबणे याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पूरस्थितीत उंच ठिकाणी जाणे, पाण्याच्या प्रवाहात न जाणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे यावर भर देण्यात आला. आपत्तीग्रस्त लोकांना वाचवण्यासाठी दोरी, काठी आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. पाण्यात किंवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने “रेस्क्यू लाईन” तयार करणे, काठीच्या मदतीने अंतर राखून मदत करणे तसेच दोन काठ्या आणि कपड्यांच्या सहाय्याने तात्पुरते स्ट्रेचर तयार करून जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी हलविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली. पूराच्या वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तात्पुरते लाइफ जॅकेट कसे बनवावे याचेही मार्गदर्शन देण्यात आले. प्लास्टिकच्या बाटल्या घट्ट बांधून किंवा नारळासारख्या तरंगणाऱ्या वस्तू कपड्यांमध्ये सुरक्षितपणे बांधून शरीराभोवती तरंगता आधार तयार करता येतो, ज्यामुळे पाण्यावर तरंगण्यास मदत होते आणि जीवितहानी टाळता येते, असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी एनडीआरएफचे शशी कुमार – Sub Inspector,
विश्वनाथ शेलार – Head Constable,
हेमंत साबळे – Constable,
सर्वेश साळुंखे – Constable आणि
प्रकाश गावडे – Constable उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे सर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व
अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. भविष्यात कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे, स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि गरज पडल्यास प्राथमिक मदत करणे यासाठी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, धैर्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. अश्या प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सावंत सर यांनी केले.
हा उपयुक्त व मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे प्राचार्य/मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे सर यांनी एन. डीआरएफच्या पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, पर्यवेक्षक सावळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख – अमर पवार, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.












