आचरा (प्रतिनिधी) : पोलीस दलातील प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अर्चना जितेंद्र म्हात्रे यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे महाराष्ट्र पोलीस उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तब्बल २१ वर्षांच्या सेवेत विविध शाखांमध्ये कर्तव्य बजावत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
अर्चना म्हात्रे यांनी आपल्या सेवाकाळात पोलीस मुख्यालय, सुरक्षा शाखा तसेच गुन्हे शाखेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आजवरच्या सेवेत त्यांना तब्बल १३१ बक्षिसे प्राप्त झाली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने सन २०२१ मध्ये पोलीस महासंचालकांचे ‘सन्मानचिन्ह’ देऊन त्यांचा गौरव केला होता.
मूळच्या हाशिवरे, अलिबाग येथील अर्चना म्हात्रे या शूटिंगबॉलचे राष्ट्रीय खेळाडू जितेंद्र म्हात्रे यांच्या पत्नी आहेत. जितेंद्र म्हात्रे हेदेखील नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस सेवा आणि क्रीडा क्षेत्राची सांगड घालत म्हात्रे दाम्पत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अर्चना म्हात्रे यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत यांनी मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












