आगीत कष्टकऱ्याचा संसार उद्ध्वस्त; १० लाखांचे नुकसान, मदतीचे आवाहन

शॉर्टसर्किटने दुकान भस्मसात; २ लाखांची रोकडही जळाली, कुंभार कुटुंबावर संकट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : निसर्गाची आणि नशिबाची साथ नसतानाही केवळ कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उभारलेला संसाराचा गाडा एका रात्रीत उद्ध्वस्त व्हावा, असा अत्यंत वेदनादायी प्रसंग सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील रहिवासी विजय सोनू कुंभार यांच्यावर ओढवला आहे. रविवारी रात्री त्यांच्या’ प्रसाद स्टोअर्स’ आणि ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य, ग्राहकांचे कपडे आणि सणासुदीच्या खरेदीसाठी जमवून ठेवलेली सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम जळून खाक झाली असून, कुंभार कुटुंबाचे सुमारे १० लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

विजय कुंभार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत इस्त्रीचा व्यवसाय चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नीचे गंभीर आजारपण आणि इतर अनेक कौटुंबिक संकटांशी लढा देत त्यांनी मोठ्या मेहनतीने हे दुकान उभे केले होते. तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी विजय परब यांच्या मालकीच्या गाळ्यात विजय कुंभार हे ‘प्रसाद स्टोअर्स’ आणि ‘सायली इस्त्री सेंटर’ चालवत होते.

नागपंचमीचा सण असल्याने पारंपरिक व्यवसायानुसार त्यांनी विक्रीसाठी नागाच्या मूर्ती, मातीची भांडी आणि विविध शोभेच्या वस्तू दुकानात ठेवल्या होत्या. तसेच प्रसाद स्टोअर्समध्ये पूजेचे व इतर विविध साहित्य उपलब्ध होते. नागपंचमीमुळे त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून इस्त्रीचे काम बंद ठेवले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या दुकानाला आग लागली. सोमवारी पहाटेच्या सुमारास रस्त्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही ग्रामस्थांना दुकातून धूर आणि आगीचे गोळे येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ विजय कुंभार आणि आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती दिली. घटनेची खबर मिळताच कुंभार यांच्यासह शेजारी, व्यापारी बांधव आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी एकत्र येत पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दुकानालगत असलेल्या इतर दुकानांना आगीचा फटका बसला नाही आणि पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने कुंभार यांच्या दुकानातील फर्निचर, पूजा साहित्य, मातीची भांडी आणि ग्राहकांनी इस्त्रीसाठी दिलेले कपडे पूर्णपणे भस्मसात झाले होते.

या दुर्घटनेतील सर्वात मोठा फटका कुंभार कुटुंबाच्या भविष्याला बसला आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकानासाठी नवीन माल खरेदी करण्यासाठी आणि सणाची तयारी करण्यासाठी विजय कुंभार यांनी अत्यंत खस्ता खाऊन २ लाख रुपयांची रोकड जमवून ठेवली होती. ती रोकडही या आगीत जळून राख झाली. दुकानातील दोन फ्रिज, फर्निचर, व्यवसायातील सुमारे ६ लाख रुपयांचे साहित्य आणि २ लाखांची रोकड, असा थेट फटका बसल्याने एकूण नुकसान १० लाखांच्या घरात गेले आहे. ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन डोळ्यांदेखत राख झाल्याचे पाहून कुंभार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उभा राहिलेला व्यवसाय असा अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुंभार कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तळवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मदतीचे आवाहन
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर उघड्यावर पडलेल्या या कष्टकरी कुटुंबाला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी आता मोठ्या मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, स्थानिक व्यापारी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कुंभार कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे काकुळतीचे आवाहन स्थानिक ग्रामस्थ आणि कुंभार कुटुंबीयांकडून केले जात आहे.

error: Content is protected !!