आंब्याचे झाड घरावर कोसळून मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आचिर्णे-घाणेगडवाडी येथे राहत्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आप्पा धोंडू राणे यांच्या घरावर हे झाड पडले. सुदैवाने या घटनेत घरातील कोणालाही दुखापत झाली नाही.

सोमवारी तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता. याचदरम्यान आचिर्णे-घाणेगडवाडी येथे पावसामुळे घरालगत असलेले आंब्याचे झाड उन्मळून राणे यांच्या राहत्या घरावर कोसळले. झाडाचा मोठा भाग घराच्या छतावर पडल्याने घराचे छप्पर तसेच भिंतीच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाड कोसळण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान छप्पर कोसळ्यामुळे पावसाचे पाणी घरात आल्यामुळे घरातील सामानसुमानाचे भिजून नुकसान झाले आहे.

सुदैवाने घरातील व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच महसूल यंत्रणेने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. राणे यांच्या घराचे नुकसान झाल्याने प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!