कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजारांची फसवणूक; मुख्य आरोपीच्या जामिनावर २९ ऑगस्टला निर्णय

*मालवणमधील १६ पीडित व गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयात हस्तक्षेप याचिका; आरोपीकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दावा, तर फिर्यादींकडून जामिनास जोरदार विरोध*

*मालवण (प्रतिनिधी) :* कर्जाचे आमिष दाखवून तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील मुख्य आरोपी शुभम कृष्णांत देशमुख याच्या जामीन अर्जावर सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी व निर्णयासाठी २९ ऑगस्ट २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना, आरोपीविरुद्ध सध्या ठोस पुरावा उपलब्ध नसून त्याला या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, मालवणमधील १६ पीडित व गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हेमेंद्र लक्ष्मण गोवेकर तसेच ॲड. तारिका प्रकाश चिंदरकर-कुबल यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून न्यायालयात आपली बाजू मांडली.ॲड. श्रीराम चिंदरकर यांनी युक्तिवाद करताना सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गुंतवणूकदार आपले पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून त्यांना प्रकरणांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.कोल्हापूरमधील अशाच एका प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदर प्रकरणातील फिर्यादीविरुद्धही कागल पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा ॲड. चिंदरकर यांनी मांडला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असून, आरोपपत्र दाखल होईपर्यंत जामीन देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद’ हे सर्वोच्च न्यायालयाचे तत्त्व असले, तरी सदर प्रकरण हे अपवादाच्या कक्षेत येत असल्याने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी ॲड. चिंदरकर यांनी केली.याचवेळी फिर्यादींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर व ॲड. प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडली. ॲड. मराठे यांनी युक्तिवाद करताना आरोपीविरुद्ध आणखी एका फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचा दावा करत, आरोपी जामिनावर बाहेर आल्यास अशाच प्रकारचे गुन्हे पुन्हा करण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.न्यायालयाने आरोपी, फिर्यादी तसेच १६ पीडित व गुंतवणूकदारांच्या वतीने करण्यात आलेले युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी २९ ऑगस्ट २०२६ रोजी तारीख दिली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी शुभम देशमुख याच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा काय निर्णय होतो, याकडे पीडित व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!