कट्टा पेंडुर काळसे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास रास्तारोको करणार

ठाकरे शिवसेना विभागप्रमुख शिवा भोजणे, युवा सेना विभागप्रमुख वंदेश ढोलम यांचा इशारा

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर काळसे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नेमका रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे सध्या कठीण झाले आहे. दुचाकी असो वा तीन चाकी अथवा चारचाकी असो प्रत्येक वाहनचालक या रस्त्याने प्रवास करताना अक्षरशः हैराण होत आहेत. खड्ड्यांमध्ये प्रवास करून वाहनाची तर वाट लागली आहे. काही वाहनचालकांना तर ह्या रस्त्याने प्रवास करताना खड्डा चुकविण्याचा नादात अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अनेक गाड्या या कारणामुळे अपघातग्रस्त होऊन नादुरुस्त देखील झाल्या आहेत.

2025-26 मध्ये वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे या हेडखाली लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु हा निधी नेमका रस्त्यासाठी होता का ठेकेदारसाठी होता हा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहून निर्माण होत आहे. असा आरोप करत लवकरात लवकर ह्या मार्गावरील खड्डे न बुजविल्यास रास्तारोको करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेना पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजणे व युवा सेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

कोकणातील महत्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ह्या मूलभूत गरजांसाठी महत्वाचे शहर असलेल्या तालुक्यात जाणाऱ्या रस्त्याची खड्डे पडून अशी दुरावस्था होणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार खासदार अशा सर्व सत्ता भाजप – शिंदे शिवसेना यांच्या हातात असताना जिल्ह्यातील प्रमुख शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था होणे ही सत्ताधारी नेते मंडळींची शोकांतिकाच म्हणावी लागेल. असा टोला लगावला आहे. आरोग्याच्या महत्वाच्या सोई सुविधांसाठी कुडाळ शहरात जावे लागते. रेल्वे प्रवासासाठी ये जा करणे यासाठी कुडाळ शहरातच जावे लागते. अनेक महत्त्वाच्या वस्तू खरेदीसाठी कुडाळ बाजारपेठ ओळखली जाते. परंतु अशा महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या मार्गाची जर दुरावस्था झाली असेल तर सर्वसामान्य नागरिक, प्रवासी चाकरमानी, वाहनचालक यांनी करायचे काय ? ह्या खड्ड्यातून प्रवास करताना अनेकाना अपघातास सामोरे जावे लागेल आहे आणि जर ऐन सणासुदीच्या दिवसात एखाद्या वाहन चालकाचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारले असता त्यांच्याकडून खड्डे बुजवण्याच्या कामासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ खड्डे बुजवावे अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!