मिळालेले बक्षीस म्हणजे आई भगवतीचा प्रसाद; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रामाणिक कष्ट करावेत : आर. जे. पवार…!

श्री भगवती देवस्थान मुणगेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; अंगणवाडी ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके

आचरा (प्रतिनिधी) : “तुम्हाला मिळालेले बक्षीस म्हणजे आई भगवतीचा प्रसाद आहे. आजचे यश हे तुमची मेहनत तसेच शिक्षक आणि पालकांच्या त्यागाचे गोड फळ आहे. यापुढे ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे कष्ट करा, यश नक्कीच तुमच्या पाठीशी असेल,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीने गावातील अंगणवाडीपासून माध्यमिक हायस्कूलपर्यंत प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप दिगंबर महाजन, सचिव निषाद परुळेकर, सदस्य प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, कृष्णा सावंत, प्रशासक सरपंच अंजली सावंत, पोलीस पाटील साक्षी गोविंद सावंत, देवदत्त पुजारे, शिक्षक प्रसाद बागवे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित सावंत, दिगंबर पेडणेकर, उपसरपंच दशरथ मुणगेकर आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत देवस्थानचे सचिव निषाद परुळेकर यांनी केले. यावेळी धर्माजी आडकर यांनी देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या गुणवंत गौरव उपक्रमाचे कौतुक केले.

भगवती हायस्कूलचे शिक्षक प्रसाद बागवे म्हणाले, “यश मिळविण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. प्रेरणेला अध्यात्माची जोड मिळाल्यास यश निश्चितच मिळते. आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.”

प्रास्ताविक करताना आबा पुजारे यांनी आगामी काळ हा अधिकाधिक स्पर्धेचा असल्याने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहून यश संपादन करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षक अविनाश राणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मुणगे सोसायटीचे अध्यक्ष गोविंद सावंत, डॉ. के. एन. नायसे, देवस्थान लिपिक रामतीर्थ कारेकर, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी आडकर, सुनील सावंत, शिक्षक प्रवीण सावरे, नंदकुमार सोनटक्के, विकी खैरनार, पांडुरंग नाडगौडा, अविनाश राणे, रवींद्र दवणे, गुरुप्रसाद मांजरेकर यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार देवस्थानचे सचिव निषाद परुळेकर यांनी मानले.

error: Content is protected !!