ठाणे येथील राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत मिळविला प्रथम क्रमांक
खारेपाटण (प्रतिनिधी) : विश्वास सामाजिक संस्था ठाणे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) यांच्यावतीने ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय मंगळागौर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण रामेश्वरनगर या गावातील स्नेहसखी मंगळागौर ग्रुपने आपली पारंपरिक संस्कृती कला सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून खारेपाटण च्या या महिला ग्रुपने राज्यात डंका निर्माण केला आहे.
मंगळावर दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या भव्य रंगमंचावर संपन्न झालेल्या या महिलांच्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे हे ५ वे वर्ष असून खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी महिला ग्रुपने फुगडी या मराठ मोळ्या पारंपरिक कलेचे सुंदर सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. यावेळी विश्वास सामाजिक संस्था ठाणे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजक संजय वाघुले व वृषाली वाघुले यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथील स्नेहसखी महिला ग्रुपला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम ३१ ००० /- रुपये रकमेचा धनादेश व सन्मानचिन तसेच प्रशस्तिपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी महिला ग्रुप ने दोन वर्षापूर्वी देखील या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी या महिला संघाला ५ व्या क्रमांकाचे यश मिळाले होते. परंतु जिद्द चिकाटी मेहनत व अचूक सरावाच्या जोरावर अखेर खारेपाटण रामेश्वर नगर येथील महिलांनी प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त करत राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी महिला ग्रुप ने मिळवलेल्या या राज्यस्तरीय यशाबद्दल खारेपाटण मतदार संघाच्या जि. प. सदस्या प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
ठाणे येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी ग्रूपच्या अनुजा ठाकूरदेसाई, शीतिजा धुमाळे, मनाली होणाळे, प्रणाली कुबल, अमृता कुबल, पूर्वा ब्रम्हदंडे, योगिता जामसंडेकर, रुपाली जामसंडेकर, जान्हवी सुतार, सुनीता तावडे, निकिता शिंदे, रंजना ब्रम्हदंडे या महिलांनी सहभाग घेतला होता. तर महिलांच्या या मंगळागौर कार्यक्रमाला स्वरसाथ अनुजा ठाकुरदेसाई यांनी दिली तर ढोलकी वादक म्हणून अथर्व जाधव याचे विशेष सहकार्य लाभले.













