वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली भट्टवाडी येथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे बाजीराव भगवान सावंत या शेतकऱ्याच्या मुरा जातीची म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्यामुळे संतप्त तिथवली ग्रामस्थानी संबधीत उपाभियंता व वायरमन यांना ग्रामपंचायत कार्यालयात घेरावा घातला. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांना माहिती मिळताच त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री भांबरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भाबरे घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत काढली.
बाजीराव सावंत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या म्हैसी चालण्यासाठी माळरानावर सोडल्या होत्या. अगोदरच माळरानावर तुटून पडलेल्या विज वाहिनीला म्हैशीचा स्पर्श झाल्यामुळे म्हैस जागी कोसळली. म्हैशीला वाचवण्यासाठी बाजीराव सावंत पुढे जात होते मात्र तत्पूर्वी बाजूला असलेल्या कामगारांना वीज वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्यांना म्हैसी जवळ जाण्यापासून रोखले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. याबाबत वायरमन यांना माहिती देण्यात आली त्यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित केला. तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन म्हैस गतप्राण झाल्याची माहिती गावात समजतात गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र झाले त्यांनी वीज वितरण चे भुईबावडा येथील शाखा अभियंता श्री नेरले व संबंधित वायरमन यांना बोलावून घेतले. वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळेच गरीब शेतकऱ्याच्या म्हशीचा मृत्यू झाला आहे असा आरोप करीत ग्रामस्थांनी या कर्मचाऱ्यांना घेराव घातला. महिनापुरापूर्वीच तिथवली येथील ग्रामस्थांनी तिथवली व तिथवली परिसरातील गावातील वीज वितरण च्या समस्या संदर्भात वैभववाडी येथील वीज वितरण कार्यालयात धरणे आंदोलन केले होते. यावेळी कार्यकारी अभियंता भामरे यांच्या समवेत झालेल्या चर्चेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र यातील कोणतेही काम झालेले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला.तसेच संबधीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली.
तर माजी सभापती नासिर काझी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पालकमंत्री राणे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी कार्यकारी अभियंता यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या. तसेच यापुढे असा अपघात होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी ब्रह्मा हरियाण संतोष हरियाण गणेश अरिअर गुलजार काजी जयराज हरियाण प्रमोद गाडगे दर्शन माईनकर सदाशिव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर मृत झालेल्या म्हशीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. सुमारे तीन ते साडेतीन वर्षाची मुरा जातीची ही माहिती सुमारे एक लाख रुपये किमतीची असल्याचे नोंद करण्यात आले आहे.












