गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास जतन करणारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राजनाथ सिंग राजनाथ राजनाथ सिंह

बांदा (प्रतिनिधी) : गोव्याच्या मुक्तिसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीराचा इतिहासात योग्य सन्मान झालाच पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासातून वगळले जाऊ नये. या सर्व हुतात्म्यांची सखोल माहिती संकलित करून त्यांची नावे कायमस्वरूपी दगडावर कोरली जावीत,” असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

​महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक पत्रादेवी गोवा येथे नूतनीकरण व उभारणी करण्यात आलेल्या भव्य ‘हुतात्मा स्मृती स्मारका’चा लोकार्पण सोहळा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. गोवा मुक्तीच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढा देणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. ​याप्रसंगी संरक्षण मंत्र्यांनी स्मृती, कणखरता आणि आशेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपणही केले.
​याशिवाय, गोवा मुक्ती संग्रामात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या राष्ट्रभक्ती, शौर्य आणि पराक्रमाचा गौरव करणाऱ्या ‘मार्टियर्स ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशनही संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार प्रेमेंद्र विष्णू शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू , उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्मारकास पवित्र तुळशी जल अर्पण करून हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शाल व स्मृतिचिन्ह प्रदान करून संरक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. गोवा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी देशभक्तीपर गीते सादर केली, ज्याचे संरक्षणमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तर संत सोहिरोबानाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा ध्वज फडकावत मान्यवरांना मानवंदना दिली.

पत्रादेवी हे देशाच्या राष्ट्रीय एकतेचे जिवंत तीर्थक्षेत्र : राजनाथ सिंह आपल्या ओघवत्या आणि राष्ट्रभक्तीने भारलेल्या भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला या सोहळ्याचे आमंत्रण दिले तेव्हा प्रत्यक्ष येथे आल्यावर इतक्या भव्य आणि देखण्या स्मारकाची कल्पनाही केली नव्हती. पत्रादेवी हे केवळ एक स्मारक नसून भारताच्या अखंडतेचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत तीर्थक्षेत्र आहे. १५ ऑगस्ट १९५५ रोजी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून सत्याग्रही गोव्यात दाखल झाले होते. तुरुंगवास आणि मृत्यू समोर दिसत असतानाही ते मागे हटले नाहीत. एका रणरागिणीला गोळी लागली तरीही तिने तिरंगा खाली पडू दिला नाही. सत्याग्रहींना स्वतःचा परिवार, संसार आणि स्वप्ने होती; मात्र त्यांनी स्वतःचा विचार न करता देशासाठी सर्वोच्च त्याग केला.”

भारताला कुणी डोळे दाखवले तर गप्प बसणार नाही
संरक्षण क्षेत्रातील भारताच्या सामर्थ्यावर बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ठामपणे सांगितले की, “आजचा भारत केवळ घाम गाळणारा राहिलेला नाही, तर बलिदान देऊनही कणखर उभा राहणारा देश आहे. भारत कोणत्याही देशाला उगीच डोळे दाखवत नाही, पण कुणी भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर देश आता शांत बसणार नाही. देशाच्या तिन्ही सेना आज सज्ज असून जगातील पहिल्या तीन सामर्थ्यशाली देशांमध्ये भारत आपले स्थान पक्के करत आहे. ५० हजार कोटी रुपयांहून अधिक संरक्षण साहित्याची निर्यात आज भारताच्या भूमीवरून होत असून देशाच्या लेकी आकाशात लढाऊ विमाने चालवून सीमांचे रक्षण करत आहेत.” पत्रादेवी येथे नागरिकांनी केवळ सेल्फी काढण्यासाठी न येता ‘विकसित भारत’ घडवण्याची प्रेरणा घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले.

​गोव्याचा स्वातंत्र्यलढा १९४६ पूर्वीपासूनचा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गोवा मुक्त झाल्याशिवाय संपूर्ण भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही, या एकाच प्रेरणेने देशभरातील सत्याग्रही पत्रादेवीच्या सीमेवर आले होते. तर कुंकळ्ळीचा ऐतिहासिक उठाव हा पोर्तुगीज सत्तेविरुद्धच्या संघर्षाचा पहिला अध्याय होता. त्यापूर्वीपासूनच गोमंतकीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू ठेवला होता.”

​मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत आणि विकसित गोवा’ घडवताना आम्ही इतिहासाचा विसर पडू दिलेला नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना सरकारी नोकऱ्या देण्यापासून ते नव्या पिढीला हा इतिहास समजावून सांगण्यापर्यंत सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पत्रादेवीच्या भूमीत देशातील ७७ हुतात्म्यांनी सांडलेले रक्त आणि त्यांचे समर्पण भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे भव्य स्मारक सदैव प्रेरणा देत राहील.”
​कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रादेवी येथे राजनाथ सिंग येणार या पश्वभूमीवर येण्यापूर्वी तब्बल एक तास आधी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. महामार्ग बंद झाल्याने महामार्ग वर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सिंधुदुर्ग पोलीस सुद्धा ठीकठिकाणी तैनात होते.

error: Content is protected !!