घोणसरीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण

नूतन सरपंच मॅक्सी पिंटो यांचा नवा आदर्श

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी गावात ७४वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात घोणसरी ग्रामपंचायतीच्या पटांगणात साजरा करण्यात आला. हा प्रजासत्ताक दिन घोणसरी गावासाठी विशेष ठरला कारण नवनिर्वाचित सरपंच मॅक्सी पिंटो यांनी गावातीलच ९० वर्षाचे जेष्ठ नागरिक दत्ताराम महादेव परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.

ध्वजारोहण प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे विविध देशभक्तीपर कार्यक्रम साजरे झाले. शाळा घोणसरी नं.१ च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. तसेच शाळा घोणसरी नं.१ ची विद्यार्थिनी पार्थवी दिपक एकावडे हिने प्रजासत्ताक दिनाविषयी भाषण केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक दत्ताराम महादेव परब यांचा सरपंच मॅक्सी पिंटो यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि उपस्थित ग्रामस्थ, विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच दिप्ती कारेकर, दूध सोसायटी चेअरमन गणेश परब, हायस्कूलचे चेअरमन भाई राणे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामसेवक सिद्धेश गोसावी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ सर्व शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!