बेंगळुरू येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील दोन आरोपिंचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद; आरोपी सुभाष एस. नरसिंहा मूर्तीचा जेलमुक्काम वाढला

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बेंगळुरू येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुभाष एस. आणि नरसिंहा मूर्ती यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 श्री. एस.एस. इंदलकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुभाष एस. आणि नरसिंहा मूर्ती याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी न्यायालयासमोर प्रभावीपणे बाजू मांडत आरोपीला जामीन देऊ नये, अशी ठाम भूमिका घेत यशस्वी युक्तिवाद केला.

डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे शरीरावर अनेक वार झालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सुभाष एस. आणि नरसिंहा मूर्ती यांच्यावर खुनाचा आरोप ठेवून त्याना अटक केली होती. या प्रकरणात आरोपीकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपीविरुद्ध उपलब्ध असलेले पुरावे, गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टीने आरोपीला जामीन मिळणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद केला. आरोपी बाहेर आल्यास तपासावर परिणाम होण्याची तसेच पुराव्यांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

खून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, प्रकरणातील परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता आरोपीस जामीन मंजूर करू नये, अशी मागणी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केली. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी सुभाष एस. आणि नरसिंहा मूर्ती यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
या निर्णयामुळे डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील आरोपी सुभाष एस. आणि नरसिंहा मूर्तीला सध्या न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे. दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याने सरकार पक्षाच्या भूमिकेला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!