गणेशोत्सवापूर्वी गगनबावडा कळे  महामार्गाची डागडुजी करा

सांगशी-कळे दरम्यान ३० किमी रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे खासगी बससेवा बंद, प्रवासाचा वेळ दुप्पट

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची सांगशी ते कळे दरम्यान सुमारे ३० किलोमीटर अंतरात अक्षरशः चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, वाहनांचे नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील खासगी आराम बससेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र कनेक्टिव्हीटीवर याचा परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.

तरेळे-कोल्हापूर हा राज्य मार्ग सन २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे रस्त्याची सुधारणा होऊन प्रवास सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. पहिल्या टप्प्यात तरेळे ते गगनबावडा दरम्यान सुमारे ३० किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. तर यागोदर कळे कोल्हापूर दरम्यान रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र गगनबावडा, सांगशी ते कळे या शिल्लक राहिलेल्या भागातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे एक ते दीड तासांचा प्रवास करण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत आहेत. वाहनांचे नुकसान होत असल्याने खासगी आराम बससेवा बंद करून काही वाहतूक फोंडाघाट-राधानगरी मार्गे, तर काही वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून वळविण्यात आली आहे.

गणेशोत्सवात चाकरमान्यांची मोठी गैरसोय
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. मुंबई-कोल्हापूर द्रुतगती मार्गाचा वापर करून पुढे कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र गगनबावडा ते कळे महामार्गाची सध्याची दुरवस्था कायम राहिल्यास प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे.

३५० कोटींच्या कामाची प्रतीक्षा; ६.५० कोटींची तात्पुरती उपाययोजना
दरम्यान, या महामार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत तात्पुरती उपाययोजना म्हणून खड्डे बुजविण्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. महामार्गाचे कायमस्वरूपी काम सुरू होण्यास आणखी काही काळ लागणार असला, तरी तोपर्यंत विद्यमान रस्ता वाहतुकीस योग्य राहील, यासाठी तातडीने खड्डे बुजवून डागडुजी करावी. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.

गगनबावडा सांगशी ते कळे दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था…

error: Content is protected !!