दंड नाही, रक्षाबंधनातून दिला हेल्मेटचा संदेश !

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वैभववाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम; हेल्मेटधारकांचे गुलाब देऊन कौतुक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, वैभववाडी पोलिसांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून दंडाऐवजी रक्षाबंधन आणि कौतुकातून हेल्मेट वापरण्याचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या  या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली. वैभववाडी बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन केले. यावेळी ‘आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा’, असा भावनिक संदेश देत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर हेल्मेट घालून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना व सीटबेल्ट लावून वाहन चालवणाऱ्या चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या जागरूकतेचे कौतुक करण्यात आले.

सामान्यतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी ‘दंडापेक्षा जाणीव महत्त्वाची’ या भावनेतून हा वेगळा उपक्रम राबविला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी हेल्मेटविना प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना राखी बांधून त्यांच्या जीविताचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना केली. हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देत पोलिसांनी त्यांच्या जबाबदार वाहनचालक वृत्तीचे अभिनंदन केले. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे वाहनचालकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली. कायदा आणि दंडाच्या पलीकडे जाऊन आपुलकीच्या माध्यमातून सुरक्षिततेचा संदेश देण्याचा वैभववाडी पोलिसांचा हा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव महिला पोलीस कर्मचारी श्रीमती तावडे, वाहतूक पोलीस रणजीत सावंत श्री तांबे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते…

error: Content is protected !!