गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका; सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – तहसीलदार सूर्यकांत पाटील.

वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. उत्सवाच्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक विभागाने घ्यावी, अशा सक्त सूचना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि आनंदात साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसील कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार निकम, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पोटे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, जितेंद्र कोलते, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर तसेच नगरपंचायतीचे श्री पवार आदी उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी चार पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वैभववाडी रेल्वे स्थानक, चेकपोस्ट, वैभववाडी बसस्थानक तसेच भुईबावडा येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी वेळेत व योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध व्यवस्था करावी, अशा सूचना तहसीलदार पाटील यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या काळात वैभववाडी शहरात होणारी नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अ. रा. विद्यालय, महाकाली कॉम्प्लेक्स, तावडे बिल्डिंग आणि जिल्हा परिषद विश्रामगृह परिसरात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत नगरपंचायतीकडून लवकरच आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

वैभववाडी शहरातील रिक्षा स्टँड तसेच वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा भाडेदराचे फलक लावण्याच्या सूचनाही तहसीलदार पाटील यांनी दिल्या. उत्सवाच्या काळात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून कोणत्याही रिक्षाचालकाकडून जादा भाडे आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. जादा भाडे आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील सर्व रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात यापूर्वीही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात वीज वितरण कंपनी आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या प्रशासनाने रद्द केल्या असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. मात्र, या महत्त्वपूर्ण बैठकीस वीज वितरण कंपनीचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित अधिकाऱ्यांना उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येतील, असे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!