लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून काजू बागेत बोर्डो मिश्रण तयार व फवारणी प्रात्यक्षिक संपन्न.!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे महादेव चंद्रकांत रावराणे यांच्या काजू व आंब्याचा बागेमध्ये बोर्डो मिश्रण तयार करणे व त्याची फवारणी या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना तांब्यावर आधारित बुरशीनाशकाचे शास्त्रीय पद्धतीने तयार करणे, योग्य प्रमाण राखणे तसेच सुरक्षित व प्रभावी फवारणीचे महत्त्व प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले.

प्रात्यक्षिकामध्ये १% बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी १ किलो कॉपर सल्फेट, १ किलो क्विक लाइम व १० लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. कॉपर सल्फेट व चुन्याचे द्रावण स्वतंत्रपणे तयार करून ते सतत ढवळत हळूहळू एकत्र मिसळण्यात आले. त्यानंतर तयार झालेले ताजे मिश्रण योग्य हवामानात स्प्रेयरच्या साहाय्याने काजूच्या झाडांवर समान प्रमाणात फवारण्यात आले. यावेळी योग्य एकाग्रता, संपूर्ण झाडावर समान फवारणी, तसेच बुरशीनाशके हाताळताना आवश्यक सुरक्षितता उपाय व शिफारशीनुसार वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट डॉ.व्ही.एन.शेट्ये व डॉ.डी.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये करण बन्ने,वेदांत घाग, स्वयंभू प्रभुदेसाई, प्रतिक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर,आदित्य प्रभुदेसाई, रीशल मस्केरेन्हस व आशिम कुमार महंती यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!