पाटबंधारे विभागाची कामे निकृष्ट ; सुधारणा करा, अन्यथा पालकमंत्र्यांकडे तक्रार! – सभापती सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : मध्यम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येणारी कालव्याची कामे निकृष्ट, दर्जाहीन होत असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने त्यांनी पंचायत समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाटबंधारे विभागाच्या कामांच्या दर्जात तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सदस्या सुवर्णा संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेष वाघ तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा माने उपस्थित होत्या.

सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मध्यम पाटबंधारे विभागाच्या कामांबाबत सभापती रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा सुधारण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. पाईप लाईन टाकताना योग्य फाउंडेशन करण्यात येत नाही. मात्र, संबंधित अधिकारी त्याची अपेक्षित दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विभागाकडून ठोस उपाययोजना नेमक्या केव्हा करण्यात येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उमेदच्या निधीचे योग्य नियोजन आवश्यक
उमेद अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. मात्र, या निधीचे योग्य नियोजन व उपयोग होत आहे का, याची नियमित पाहणी करणे आवश्यक असल्याचे सभापती रावराणे यांनी सांगितले. प्रभाग संघामध्ये चर्चिल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती बचत गटातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, अशी सूचना पालांडे त्यांनी केली.

स्मार्ट मीटर बसविताना वीज वितरण कंपनीने नागरिकांना विश्वासात घेऊनच कार्यवाही करावी, असे मत सभेत व्यक्त करण्यात आले. नागरिकांना माहिती न देता प्रक्रिया राबविल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी नागरिकांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्याशी समन्वय साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर गेल्यावेळी पंचायत समिती सभेत याबाबत विषय काढला तर दुसऱ्या दिवशी माझा घराचा मिटर बदलला. ही जशी तत्परता दाखवता तशी इतर कामातही दाखवा. असे खड्डे बोल देवानंद पालांडे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

खत खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक
खत खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनी दिली. ऑनलाइन अर्ज केल्यानंतरच संबंधित खत विक्रेत्याकडून खत खरेदी करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यात २३ कामांना मंजुरी मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

वैभववाडी-भुईबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी बससेवा केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सदस्य देवानंद पालांडे यांनी उपस्थित केला. ही बससेवा सुरू झाल्यास भुईबावडा पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याने ती तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

वैभववाडी बाजारपेठेतील विश्रामगृह परिसर सुसज्ज करून तेथे गाळे उभारत गावठी बाजार विकसित करण्याचा प्रस्ताव सभापती रावराणे यांनी मांडला. या परिसराच्या विकासासाठी तालुक्यातील सुज्ञ नागरिक, शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेऊन नियोजन करण्यात यावे. परिसराचा सर्वांगीण विकास करून शेतकरी व स्थानिक विक्रेत्यांना त्याचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था उभारावी, असे त्यांनी सांगितले.

वैभववाडी-फोंडा मार्गावरील धोकादायक झाडे न तोडता केवळ फायद्याची झाडे तोडण्यात आल्याचा आरोप सदस्य मंगेश लोके यांनी केला. तसेच खांबाळे आदिष्टी देवी मंदिर व आचिर्णे हायस्कूल येथे स्पीड ब्रेकअर बसवण्याची मागणी केली. तर राज्य मार्गांवर शाळा, महाविद्यालय, गाव, दवाखाना दर्शविणारे बोर्ड लावण्याची सूचना सभापती रावराणे यांनी केली.

करूळ गावातील वैद्यकीय उपकेंद्र रस्त्यालगत उभारल्यास नागरिकांना अधिक सोयीचे ठरेल, अशी सूचना उपसभापती साची कोलते यांनी केली.   तसेच काही अंगणवाडी केंद्राच्या इमारती नादुरुस्त आहेत. त्या सर्व इमारती सुसज्ज बांधण्यात याव्यात. अशी मागणी मंगेश लोके यांनी केली.

error: Content is protected !!