व्यापारी, रिक्षाचालक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांची नियोजन बैठक संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील प्रसिद्ध दहीकाला उत्सव व आगामी येणाऱ्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राच्या वतीने गावातील व्यापारी रिक्षसंघटना चालक मालक, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधीची सुरक्षापूर्व नियोजन बैठक शुक्रवार दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे संपन्न झाली.
यावेळी खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस हवालदार (६३९) मिलिंद देसाई, सोबत पोलिस कॉन्स्टेबल (१२३३) सुनील निकम, पोलिस कॉन्स्टेबल (१०४६) गुहाडे, जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, व्यापारी असो. चे अध्यक्ष चेतन हुले व विविध संघटनाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण बाजारपेठेतील गणपती व दहीहंडी सणाच्या अनुषंगाने रिक्षा चालक-मालक संघटना व व्यापारी यांना खारेपाटन एस टी स्टँड या ठिकाणी बोलावून बाजारपेठ व एसटी स्टँड पर्यंत होणारी वाहतूक कोंडी बाबत वाहतूक नियोजनाची चर्चा केली. तसेच धार्मिक सण साजरे करत असताना शांततेत सण साजरे करण्याच्या सूचना करण्यात आला. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नियोजन साठी आवश्यक असणारी मदत करण्याचे आश्वासन सरपंच महेंद्र गुरव यांनी दिले. तर रिक्षा संघटना व व्यापारी यांनी देखील पोलिस प्रशासनाला आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस हवालदार श्री देसाई यांनी सर्व नागरिकांना बंदोबस्त कालावधीत पोलिसांना सहकार्य करण्याबाबत विनंती केली.तर रस्ते अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने कृपया नागरिकांनी लावू नयेत. पार्किंग करिता खारेपाटण हायस्कूल च्या पटांगणाचा वापर करावा अशाही सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.









