घोणसरी-पिंपळवाडी-खवळेभाटले येथे स्ट्रीट लाईट कामांचा शुभारंभ

ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास

फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी-पिंपळवाडी व खवळेभाटले परिसरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामांचा शुभारंभ पं. स सदस्य मानसी मराठे तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यामध्ये पिंपळवाडी येथील पेडणेकर घर ते खाड्ये यांच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट, तसेच घोणसरी-पिंपळवाडी मुख्य रस्ता आणि घोणसरी मुख्य रस्ता ते खवळेभाटले या मार्गावरील स्ट्रीट लाईटच्या कामांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे तसेच जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्या मानसी बाळकृष्ण मराठे यांनी घोणसरी गावातील पिंपळवाडी खवळेभाटले परिसरातील स्ट्रीट लाईट साठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्णत्वास आली आहे.

या परिसरात सायंकाळच्या वेळेस अनेक ग्रामस्थ दूध घालण्यासाठी डेअरीवर जात असतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचीही या मार्गावरून ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध झाल्याने सायंकाळनंतरची ये-जा अधिक सुरक्षित व सोयीची होणार असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या कामांच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, घोणसरी सरपंच प्रसाद राणे, उपसरपंच अंकिता परब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अशोक राणे, आप्पा पेडणेकर, दिवाकर कारेकर तसेच पिंपळवाडी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वर्षांची मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पंचायत समिती सदस्या मानसी मराठे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!