कांदिवलीच्या के.ई.एस श्रॉफ कॉलेज आणि विठ्ठलदास संघवी ज्यू. कॉलेज कडून समर्थ आश्रमास जीवनावश्यक साहित्याची मदत

‘जॉय ऑफ गिव्हिंग’ पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी केले साहित्य संकलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित आणि गरजू बांधवांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कांदिवली एज्युकेशन सोसायटी संचलित के.ई.एस श्रॉफ कॉलेज, बि. के श्रॉफ आर्ट्स, एम. एच श्रॉफ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विठ्ठलदास एच. संघवी ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ पंधरवड्यात संकलित करण्यात आलेले विविध जीवनावश्यक साहित्य समर्थ आश्रम, विरारफाटा येथे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले.

२७ जुलै ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश समाजातील निराधार व वंचित व्यक्तींना आवश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदत करणे हा होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित केले.

दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या सामाजिक उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.तर समर्थ आश्रमासाठी देण्यात आलेल्या साहित्यामध्ये प्लास्टिक टब, चटया, डस्टबिन, पाण्याच्या बाटल्या, बेडशीट्स, ब्लँकेट्स, डायपर, झाडू, टॉयलेटरीज, शॅम्पू, साबण, तेल यांसह अन्नधान्य, कडधान्ये, विविध डाळी, मसाले आणि इतर किराणा साहित्याचा समावेश होता.

कॉलेजच्या डिरेक्टर जनरल डॉ.लिली भूषण, इनचार्ज प्रिन्सिपल डॉ.नंदिनी कट्टी आणि उपप्राचार्य यांच्यासह टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ चे एकूण उपक्रमाच्या आयोजनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य राहिले.”समाजातील गरजू व्यक्तींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत मोलाचे ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये ‘देण्याचा आनंद’ आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे समर्थ आश्रमाच्या विश्वस्त व स्टाफ टीमने सांगितले.”

समर्थ आश्रमाचे विश्वस्त यांनी श्रॉफ कॉलेजमधील सर्व विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेले हे योगदान आश्रमातील निराधार बांधवांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!