तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या कु. रेवण राऊळचे नेत्रदीपक यश

तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण च्या इयत्ता नववी ‘अ’ मध्ये शिकणारा कुमार रेवण राऊळ याने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेची व कौशल्याची चमक दाखवत तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये रेवणने शांत डोक्याने केलेले डावपेच, अचूक निर्णयक्षमता आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन यामुळे त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल IndusInd Bank शाखा तळेरे च्या शाखा व्यवस्थापक सावंत मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रेवणचे तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

कु.रेवण राऊळ च्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही तो निश्चितच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास शिक्षक व विद्यालय परिवाराने व्यक्त केला.

रेवण राऊळच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत अशा रीतीन शिक्षक तेंडुलकर सर, भिसे सर व पाडवी सर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!