२५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कुडाळ–देवगड बसफेरी महिनाभर बंद; विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह चाकरमान्यांचे हाल

आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात प्रवाशांना एसटी कडून दिलासा मिळणे अपेक्षित असताना, चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणारी कुडाळ आगाराची २५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कुडाळ–देवगड बससेवेलाच ब्रेक लागला आहे. कुडाळ आगारातून सायंकाळी ५ वाजता सुटणारी कुडाळ–कणकवली–त्रिंबक–चिंदर–आचरा मार्गे देवगड जाणारी बसफेरी गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शालेय विद्यार्थी, चाकरमानी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

कुडाळ आगारातून सायंकाळी ५ वाजता देवगडकडे जाणारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच मार्गाने कुडाळकडे परतणारी ही बसफेरी अनेक दिवसांपासून अनियमित सुरू होती. त्यानंतर ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांसमोर वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या बस सेवेवर शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे चाकरमानी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. बस बंद झाल्याने प्रवाशांना खासगी वाहने किंवा अन्य पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळे सोबतच प्रवासाचा अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.

बस फेरी पूर्ववत करण्यासाठी कुडाळ आगारप्रमुख, विभाग नियंत्रक कणकवली तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी ही बसफेरी तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच २५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली एसटी सेवा ऐन गणेशोत्सवाच्या हंगामात महिनाभर बंद राहिल्याने एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कुडाळ–देवगड बसफेरी पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!