चालक गंभीर जखमी ; हल्लेखोर पसार
कणकवली ( आनंद तांबे ) : गोव्याला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाला बेदम मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना गणेशचतुर्थी च्या आदल्या रात्री घडली. मुंबई गोवा नॅशनल हायवेवर कणकवली तालुक्यातील हुंबरठ गावात रविवार 13 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रविवार 13सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास रेहान इकबाल सय्यद ( वय 32 रा. वागूवाडा, राजापूर ,जि. रत्नागिरी )यांच्याकडे तिन अनोळखी प्रवाशांनी गोव्याला जायचे असून भाड्याने कार हवी असल्याचे सांगितले. रेहान इकबाल यांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार ( MH 43 – AJ 6189 ) मधून तिन्ही प्रवाशांचे भाडे घेऊन गोव्याच्या दिशेने राजापूर मधून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास निघाले. नॅशनल हायवेवर हुंबरठ येथे लघुशंकेसाठी रेहान यांनी कार थांबवल्यानंतर पुढील प्रवासात कार आपण चालवतो असे भाडे घेतलेल्या प्रवाशांनी सांगितले. मात्र रेहान यांनी कार आपण स्वतःच चालवणार असे सांगून कार चालवायला देण्यास विरोध दर्शविला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली आणि त्या तिन्ही प्रवाशांनी रेहान याना बेदम मारहाण केली. त्यातील एकाने रेहान यांच्या दोन्ही पायांच्या पोटरीवर चाकूने वार केले आणि रात्रीच्या अंधारात रेहानला आणि कार तिथेच सोडून तिन्ही हल्लेखोर पसार झाले. याच दरम्यान नांदगाव हुन कणकवली च्या दिशेने पेट्रोलिंग करून जाणाऱ्या आरटीओ ऑफिसर ना रेहान हा रस्त्यावर विव्हळत पडलेला दिसला. त्यांनी लागलीच ही बाब कणकवली पोलीस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, एपीआय गणेश पवार, पीएसआय प्रितेश पाटील, हवालदार शिवगण आदींनी घटनास्थळी भेट दिली. जखमी रेहान याला तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गुन्ह्याच्या घटनेतील स्विफ्ट कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून कणकवली पोलीस हल्लेखोरांचा कसून तपास करत आहेत. जखमी रेहान याला अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. जखमी रेहानच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी त्याला राजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.











