फोंडाघाट राधाकृष्ण वैश्य समाज आणि बालगोपाळ मंडळ आयोजित,पेठेतील मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह २६ चा शानदार शुभारंभ !

श्रद्धा, समर्पण आणि एकतेचा सामुदायिक आणि आनंददायी अनुभव —

राधाकृष्ण माता आमची उभी देवळात ! चा नाम संकीर्तनासह जल्लोष !

विविध अध्यात्मिक, सांस्कृतिक, रंगीत संगीत दिंड्या, चित्ररथ, देखावे– यावर्षी फोंडाघाट मधील सात दिवस मंतरलेले !

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : प्रतिवर्षाप्रमाणे पंचमी ते एकादशी असा ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर, असा उदंड उत्साहात संपन्न होणाऱ्या फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ, घटस्थापनेने फटाक्याच्या आतषबाजीत आणि भाविकांच्या- बालगोपाळांच्या हरिनामाच्या जल्लोषात उदंड उत्साहात करण्यात आला.

त्यापूर्वी सकाळी श्री राधाकृष्ण- गणपतीची पूजाअर्चा पार पडली. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त घटस्थापना व पोथीची यथासांग पूजा करण्यात आली. गावच्या मानकऱ्यांनी हा महोत्सव यथासांग उत्साहात आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी देवतांना साकडे घातले. वीणाधारकानी हरिनामाचा वीणेवर झंकार केला. आणि फटाक्याची एकच आतषबाजी झाली. आणि “— राधाकृष्ण माता आमची उभी देवळात !” चा गजर आप्पा पारकरांच्या सुरात सूर मिसळत उपस्थित भाविकांनी केला. मारुती मेस्त्री यांचे हरिनामाचे अभंग, खड्या आवाजातील गजरावर युवाईला थिरकण्यास भाग पाडले.

गेले दोन दिवस बालगोपाळ मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते एक दिलाने आपला महोत्सव समजून, प्रत्येक नियोजनासाठी आणि कामासाठी कटिबद्ध झाले होते. नंदू उचले आणि वीरेश रेवडेकर यांनी मंदिरासह संपूर्ण बाजारपेठेत रोषणाई मनमोहक केली. तर भाजीपाला मित्रमंडळाने सुमारे वीस वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच उत्साहात, एसटी स्टँड समोर उभारलेली स्वागत कमान आणि त्यावरील विद्युत रोषणाई लक्षणीय केली. चौथ्या दिवशी ते अघोरी नृत्य, ढोल ताशांच्या गजरात देखावे सादर करणार आहेत. तर रात्री बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा संदीप पुजारे यांच्यात पारंपारिक डबलबारी चा जंगी सामना रंगणार आहे. पहिले तीन दिवस आर. के. ग्रुपच्या लोकप्रिय भजन स्पर्धा, पाचव्या दिवशी दत्ती- सानोरी महिला दशावतार नाट्य मंडळाचे “दुर्वास ऋषी गर्वहरण” हा नाट्य प्रयोग होणार आहे. सहाव्या दिवशी फोंडा हायस्कूलची भव्य शोभायात्रा, लोककलाचे कलांचे प्रात्यक्षिक मनोरंजक ठरणार आहे. सातव्या दिवशी बालगोपाळ मंडळाची रंगीत संगीत दिंडी रंगतदार ठरणार आहे.याशिवाय महिलांसाठी हळदीकुंकू, फुगड्या, रील स्पर्धा इत्यादी भरगच्च कार्यक्रम भाविकांसाठी, रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

पूर्ण फोंडाघाट पंचक्रोशीसह बाजारपेठ या निमित्ताने महासोहळ्यात श्रद्धा- समर्पण- युवाईची एकत्र येऊन नव्यांना संधी देण्याची समजदारी आणि एकातेचे दर्शन खेळीयाच्या प्रांगणात आशादायी ठरणार आहे. या महोत्सवात सर्वांनी येऊन सहभाग घ्यावा. अन् आनंददायी,चैतन्याची अनुभूती घ्यावी. असे आवाहन वैश्य समाज आणि बालगोपाळांनी केले आहे.

error: Content is protected !!