दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधणार – जि. प. उपाध्यक्ष दादा साईल
ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला वनराई बंधारा अणाव परबवाडी येथे बांधण्यात आला. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल या निमित्ताने उचलले गेले. यावेळी सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, आणावं सरपंच लीलाधर अनावकर, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, संविता आश्रमचे संदीप परब, रोटरी सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, राजन बोभाटे, असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने, राजीव पवार, उपसरपंच सौ. अदिती अणावकर, कृषी अधिकारी संदेश परब, विनायक अणावकर, महेश परब , ग्रा.प.सदस्य मृणाल परब , सुवर्णा परब , किरण आंगणे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले की, दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांना ट्रिगर 1 जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाणी बचत व संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात १० हजारांहून अधिक वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. याचा शुभारंभ आज रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन यांच्या सहकार्याने अणाव येथून झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी असे बंधारे बांधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच येत्या १५ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधण्याचा संकल्प हाती घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.












