अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६
चौके (प्रतिनिधी) : कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण व अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांना तसेच शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘आत्मा कॅफेटेरिया’ अंतर्गत वैयक्तिक शेतकरी पुरस्कार व शेतकरी गट पुरस्कार (सन २०२६-२७) जाहीर करण्यात आले आहेत.
मालवण तालुक्यातील पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी पुरस्कारासाठीचे अर्ज व प्रस्ताव दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मालवण येथे सादर करावेत, असे आवाहन आत्मा शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष मालवण व तालुका कृषि अधिकारी, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- वैयक्तिक शेतकरी पुरस्कार
जिल्ह्यातील निवडक १० उत्कृष्ट शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून, प्रत्येक पुरस्कारार्थ्यास ₹२५,०००/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रमुख पात्रता व निकष :
- शेतकरी किंवा महिला शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असणे व कुटुंबासह शेती हा मुख्य व्यवसाय असणे आवश्यक.
- सेंद्रिय/नैसर्गिक शेती, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, ठिबक/तुषार सिंचन, सूक्ष्म सिंचन आदींचा प्रभावी वापर केलेला असावा.
- कृषि उत्पादनाची प्रक्रिया, मूल्यवर्धन व प्रभावी विपणन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
- अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- केंद्र किंवा राज्य शासनाचा यापूर्वीचा कोणताही मोठा कृषि पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.
- शेतकरी गट पुरस्कार
मालवण तालुक्यातून गुणांकनाच्या आधारे सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या ५ शेतकरी गटांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक गटास ₹१०,०००/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रमुख पात्रता व निकष :
- केवळ ‘आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गट तसेच CIG/FIG गट पात्र राहतील.
- गटामध्ये किमान ११ सदस्य असणे आवश्यक आहे.
- जैविक निविष्ठा निर्मिती, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सामूहिक शेती, शेतमाल प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकेजिंग व थेट विपणन आदी उपक्रम राबविणाऱ्या गटांना मूल्यांकनामध्ये महत्त्व दिले जाईल.
महत्त्वाचे वेळापत्रक
अर्ज व प्रस्ताव सादर करणे – १५ ऑक्टोबर २०२६
प्राथमिक पाहणी व क्षेत्र तपासणी – ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत
तालुका व जिल्हास्तरीय समिती मूल्यांकन – ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
मालवण तालुक्यातील प्रयोगशील, नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच सक्रिय शेतकरी गटांनी मोठ्या संख्येने या पुरस्कार योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी आपले गावचे सहाय्यक कृषि अधिकारी किंवा ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.











