पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जि.प. सदस्य मनोज रावराणे यांच्यासह अधिकाऱ्यांची करंजेतील पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना
कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,कृषी विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी करंजे गावातील घणसमळा भागातील भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माजी सरपंच मंगेश तळगावकर, राजेश परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा परब, तुकाराम परब, बूथ अध्यक्ष तुकाराम बागवे, गणेश परब, बाबू भाकरीये, उत्तम वावळीये, प्रकाश परब, अजित घोने, अर्पीत दळवी, प्रवीण भोगले आदी उपस्थित होते.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भात पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भातपिकाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नसल्याने पिके करपण्याची, वाढ खुंटण्याची तसेच अपेक्षित उत्पादनात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.
पाहणीदरम्यान पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी भातशेतीचे झालेले नुकसान, पिकाची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनातील घट याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
यावेळी भातपिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करून शासनाच्या मदतीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.










