भूजलपातळी वाढविण्यासाठी तालुक्यात 2 हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट – सभापती हर्षदा वाळके
हरकुळ जि. प.मतदारसंघात जलसंवर्धनसाठी मनोज रावराणेंचा पुढाकार ; स्वखर्चाने जेसीबी ट्रॅक्टर केला उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भूजलपातळी वाढवून उन्हाळी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी कणकवली तालुक्यात 2 हजार वनराई बंधारे आणि जलतारा खड्डे मारले जाणार असल्याचे कणकवली पं. स सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील करंजे गावात ब्राम्हणमंदिर समोरील ओहोळात वनराई बांधण्याचा शुभारंभ सभापती हर्षदा वाळके यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी उपसभापती सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर करंजे माजी सरपंच मंगेश तळगावकर, राजेश परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा परब, तुकाराम परब, भाजपा बूथ अध्यक्ष तुकाराम बागवे, गणेश परब, बाबू भाकरीये, उत्तम वावळीये, प्रकाश परब, अजित घोने, अर्पीत दळवी, प्रवीण भोगले, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच करंजेवासीय उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या की, अल निनो मुळे यावर्षी केवळ 74 % पाऊस पडला आहे. आगामी आठ महिन्यांत अत्यंत कडक उन्हाळा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या काळात पिण्याच्या आणि अन्य कामासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. पावसाचे पडलेले पाणी जलमार्गातून वाहून वाया जाते. हेच पाणी आज अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. आज जमिनीत पाणी मुरवल्यामुळे आगामी काळात भूजलपातळी वाढून त्याचा फायदा पुरेसे पाणी मिळण्यास होईल. यासाठीच कणकवली तालुक्यात 2 हजार वनराई बंधारे बांधून त्याद्वारे पाणी अडवून जमिनीत मुरवले जाणार आहे. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे जि प सदस्य मनोज रावराणे म्हणाले की, सध्या सिंधुदुर्ग जिल्हा हा ट्रिगर वन मध्ये आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना जलसंवर्धन करण्यासाठी सूचना केल्या आहेत. कोरडा दुष्काळ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील 10 हजार वनराई बंधारे बांधण्याचे आणि जलतारा खड्डे मारण्याचे उद्दिष्ट आहे. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 9 गावे असून या नऊ गावांमध्ये पुढील आठ दिवसांत आवश्यक ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. नऊ गावांमध्ये एकूण 200 वनराई लोकसहभागातून बांधण्यासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर स्वखर्चाने उपलब्ध करून दिला असून नियोजनबद्ध काम करून कोरडा दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करणार आहोत.












