वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम व सहकारी टीमचे अभिनंदन
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकतील खारेपाटण गावातील प्रा.आ.केंद्रात रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी दोन महिलांच्या यशस्वी प्रसूती पार पडल्या याकरिता प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम व त्यांच्या सहकारी आरोग्य कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण प्रा.आ केंद्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्वाचे केंद्र असून येथे देवगड, कणकवली, वैभववाडी व राजापूर अशा चार तालुक्यातील सुमारे ४० गावचे रूग्ण विविध उपचार व तपासणी करण्यासाठी येत असतात. मागील ६ महिन्यात येथील प्रा.आ.केंद्रात एकूण ५ महिलांच्या यशस्वी प्रसूती करण्यात आल्या असून येथील आरोग्य कर्मचारी चागल्या प्रकारे रुग्णांना सेवा देण्याचे काम करत आहेत.
खारेपाटण येथे दि.२७ सप्टेंबर २०२७ रोजी येथील हायस्कूल मध्ये १० ते २ या वेळात खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्या ठिकाणी सुमारे दीड हजार येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संपूर्ण स्टाफ कार्यरत असताना खारेपाटण प्रा.आ. केंद्रात एकाच वेळी व एकाच दिवशी दोन महिला प्रसूती साठी दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. एवढेच नव्हे तर याच दिवशी राष्ट्रीय महामार्गावर वाहन अपघातात जखमी झालेले रुग्ण देखील प्रा.आ.केंद्रात आल्याने या संपूर्ण कठीण परिस्थितीत प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम व त्यांचे सरकारी कर्मचारी यांनी कोणताही ताण न घेता संयम राखत व योग्य नियोजन करत आरोग्य सेविकांच्या सहकार्याने या दोन्ही महिलांच्या अडीच तासाच्या फरकाने यशस्वी प्रसूती करून दोन्ही गरोदर मातांना व नवजात बालक यांना या संपूर्ण प्रक्रियेतून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
खारेपाटण प्रा.आ.केंद्रात प्रसूती करीता दाखल झालेल्या या महिलांमध्ये वारगाव येथील १ महिला तर खारेपाटण येथील १ महिला यांचा समावेश होता. दोन्ही महिलांच्या एकाच दिवशी अत्यंत कमी तासाच्या फरकाने यशस्वी प्रसूती पार पाडल्याबद्दल खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम व त्यांचे महिला कर्मचारी आरोग्य साहियीका उषा काटकर, आरोग्य सेविका दीपाली दुखंडे व लक्ष्मी करोड आशा स्वयंसेविका रचना शेट्ये, समृद्धी पाटील व सफाई कामगार विशाखा पाटणकर यांचे जि. प. सदस्या तथा खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी अभिनंदन केले आहे.










