कृष्णापटणम अदानी पोर्टच्या पाहणीतून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची अत्याधुनिक बंदर सुविधांची पाहणी

कृष्णापटणम (प्रतिनिधी) : आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज भेट देऊन बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा तसेच आधुनिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष पाहणी केली.महाराष्ट्राच्या बंदर विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्षम व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून त्यातील महाराष्ट्रासाठी उपयुक्त बाबी राज्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने या अभ्यासदौऱ्याचे महत्त्व असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान बंदरातील कार्गो हाताळणीची कार्यपद्धती, खोल पाण्यातील जहाजांच्या वाहतुकीसाठीची सुविधा, अत्याधुनिक पायाभूत व्यवस्था आणि बंदराच्या दैनंदिन कामकाजातील तंत्रज्ञानाचा वापर याबाबत माहिती घेण्यात आली.तसेच बंदर क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासनाची भूमिका काय असावी, मंजुरी प्रक्रिया कशा पद्धतीने अधिक सुलभ करता येईल, उद्योगांसमोरील कामकाजातील अडचणी कशा दूर करता येतील आणि बंदरांच्या माध्यमातून व्यापक आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था कशी निर्माण करता येईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला असून राज्यातील बंदर क्षेत्राच्या विकासाला मोठी क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बंदर क्षेत्राला आधुनिक, सक्षम आणि जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी अशा अभ्यासदौऱ्यांतून मिळणारे अनुभव उपयुक्त ठरणार आहेत.

यावेळी कृष्णापटणम पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश पटेल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे CEO प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता मनिष मेटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!