शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते भगवद्गीता देऊन रांगोळीकार समिर चांदरकर यांचा गौरव
आचरा (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ७ ऑक्टोबर रोजी सिंधुनिती, नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या निमित्ताने शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया अभियान’ या विषयावर आकर्षक रांगोळी वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टा चे कला शिक्षक समिर चांदरकर यांनी साकारली. तब्बल चार फूट बाय आठ फूट आकाराची ही रांगोळी अवघ्या दोन तासांत साकारण्यात आली. रांगोळीमधून अभियानाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आल्याने उपस्थित मान्यवरांचे विशेष लक्ष वेधले.
या कलाकृतीची शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विशेष दखल घेत कौतुक केले. तसेच भगवद्गीता देऊन रांगोळी कलाकार समिर चांदरकर यांचा सन्मान केला. त्यांच्या हस्ते झालेल्या या गौरवामुळे या कलाविष्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष साहिलजी, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, प्रितेश राऊळ, बांधकाम समिती अध्यक्ष संतोष साठविलकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही रांगोळीचे कौतुक करत ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा संदेश कलात्मक पद्धतीने प्रभावीपणे मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या रांगोळीमुळे आढावा बैठकीच्या कार्यक्रमाला कलात्मकतेची विशेष जोड मिळाली.











