चिंदर नं. १ शाळेत दसरोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी !

‘चंद्रकोर’ मर्दानी खेळांसह ‘भक्तीधारा’तून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे होणार दर्शन

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर येथील शाळा चिंदर नं. १ मध्ये सरस्वती पूजना निमित्त दसरोत्सवाच्या दिवशी,आज मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांसह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमांमुळे दसरोत्सवाचा उत्साह अधिकच वाढणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत रात्री ९.३० वाजता शिवकालीन ‘चंद्रकोर’ मर्दानी खेळांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आखाडा चिंदर यांच्यावतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्यानंतर रात्री १० वाजता ‘भक्तीधारा’ हा शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.

या सांस्कृतिक सोहळ्याला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती, शाळा चिंदर नं. १ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!