शारदोत्सवात ‘दुष्काळ’ नाटिकेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या!

पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा कै. बा. ना बिडये विद्यालय आचर्यांच्या विद्यार्थ्यांनी दिला संदेश

भावूक करणाऱ्या सादरीकरणाला प्रेक्षकांची दाद

आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित शारदोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमात ‘दुष्काळ’ या विषयावर आधारित नाटिका शनिवार १७ ऑक्टोबर रोजी कै. बा. ना. बिडये केंद्र शाळा आचरा येथे सादर करण्यात आली. या नाटिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून दुष्काळाचे भीषण वास्तव उभे करत उपस्थित प्रेक्षकांना भावूक केले.

पावसाअभावी करपणारी पिके, शेतकऱ्यांची अपूर्ण राहणारी स्वप्ने, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता, मुलांच्या इच्छा-आकांक्षा आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या अशा विविध अडचणींचे चित्रण या नाटिकेतून करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, याचे वास्तवदर्शी दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून घडवले.

पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ, शेतीवर होणारे विपरीत परिणाम आणि पाण्याअभावी निर्माण होणाऱ्या समस्याही नाटिकेतून अधोरेखित करण्यात आल्या. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे किती आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे पटवून दिले. पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे महत्त्वही या सादरीकरणातून विशद करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रभावी अभिनयामुळे नाटिका पाहताना उपस्थित प्रेक्षक भावूक झाले. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या या सादरीकरणाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून दिला.

“पाणी अडवा, पाणी जिरवा; दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवा!” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले.

error: Content is protected !!