जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता दुसरीतील देवश्रीने पटकावला प्रथम क्रमांक
शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून अभिनंदन
आचरा (प्रतिनिधी) : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चिंदर नं. १ येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या देवश्री सचिन तवटे हिने चित्रकला स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात देवश्रीने मिळविलेल्या या यशामुळे चिंदर नं. १ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षकवृंद तसेच पालक, ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लहान वयातच जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने देवश्रीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











