चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी चिपळुणातील शिक्षक पतपेढी सभागृहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

संपूर्ण वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने बैठकीची सुरुवात झाली. यावेळी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकातून प्रशांत यादव यांनी राष्ट्रचिंतन बैठकीचा उद्देश स्पष्ट करत पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात बूथस्तरापासून पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. भाजपची ध्येय-धोरणे, भूमिका आणि विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान SIRच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष आशिष खातू तसेच चिपळूण शहर महिला मोर्चा अध्यक्ष रुही खेडेकर यांचा आमदार प्रमोद जठार व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बैठकीला रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!