विकासाचे राजकारण बोला, द्वेषाचे नाही!
कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर केलेले आरोप हे “सौ चुहे खाके बिल्ली हज को चली” या म्हणीप्रमाणे असून पराभवाच्या नैराश्यातून केलेले बिनबुडाचे आरोप आहेत, असा घणाघात युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांच्यावतीने करण्यात येत आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांनी पत्रकाद्वारे पुढीलप्रमाणे उत्तर दिले आहे.
- 36 वर्षांचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या 10 वर्षांचा हिशेब द्यावा:
नारायण राणे साहेबांनी सिंधुदुर्गाला काय दिले हे संपूर्ण जिल्हा जाणतो. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग किल्ला विकास, आंबोली घाट रस्ता आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती ही राणे साहेबांचीच देन आहे. वैभव नाईक यांनी 10 वर्षात कुडाळसाठी एक तरी नवीन एमआयडीसी मंजूर करून आणली का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. - 40 एकरचा खोटा आरोप – पुरावे द्या नाहीतर माफी मागा:
राणे कुटुंबाच्या कंपन्या अशी एकही कंपनी नाही. ज्या कंपन्यांनी जागा घेतल्या आहेत त्या राणे साहेबांनी आणलेल्या उद्योगांनी घेतल्या आहेत. त्या जागा ओसाड नाहीत, त्यावर प्रक्रिया सुरू आहे. वैभव नाईक यांनी हवेत गोळीबार न करता कोणत्या कंपनीने, केव्हा आणि कुठली जागा घेतली याची पुराव्यासह नावे जाहीर करावीत. - वैभव नाईकांनी आणलेले उद्योग कोणते? फक्त फीत कापली:
त्यांनी सांगितलेली गोदरेज, बजाज राईस मिल हे सगळे प्रस्ताव 2012-13 चे आहेत, म्हणजे राणे साहेब उद्योगमंत्री असतानाचे प्रस्ताव आहेत. वैभव नाईक यांनी फक्त उद्घाटनाच्या फिती कापल्या. स्वतःच्या 10 वर्षाच्या काळात एकही मोठा ब्रँडेड उद्योग ते आणू शकले नाहीत. फक्त नारळ फोडून फोटो काढले. - 30 कोटीच्या रस्त्यावर कमिशनचा आरोप म्हणजे पराभवाचा जलफळाट:
आमदार निलेश राणे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप करणे हा गुन्हा आहे. एम.आय.डी.सी चे रस्ते हे शासनाच्या E-Tendering प्रक्रियेने होतात, आमदाराच्या खिशातून नाही. वैभव नाईक यांनी याचे पुरावे द्यावेत, नाहीतर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. तुम्ही आमदार असताना MIDC मध्ये साधा 30 लाखाचा तरी रस्ता केला होता का? एक दाखवा! आज निलेश राणे साहेब 30 कोटी आणतात म्हणून पोटात गोळा येणे स्वाभाविक आहे.
युवासेनेचे खुले आव्हान:
हिंमत असेल तर वैभव नाईक यांनी कुडाळ MIDC च्या गेटवर यावे, समोरासमोर हिशेब करू. 10 वर्षात तुम्ही काय केले आणि 1 वर्षात निलेश राणे काय करत आहेत हे जनताच ठरवेल.
आजची वस्तुस्थिती अशी आहे की, निलेश राणे साहेब आमदार झाल्यापासून फक्त 1 वर्षात कुडाळ एमआयडीसीला 21 व्या शतकाचे रूप देण्यासाठी ₹30 कोटीचा डीपी प्लॅन, पाणी, वीज, ड्रेनेज आणि नवीन उद्योगांसाठी प्रयत्न सुरू आहेत. जे 10 वर्षात झाले नाही ते आता होत आहे.
तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशहा आहात, आम्ही विकासाचे वाघ आहोत! पोकळ आरोप बंद करा आणि विकासावर बोला!











