पणदूर येथील तिरंगी ट्वेन्टी ट्वेन्टी भजन वादावर जिल्हा भजनी कलाकार मंडळाचा निर्णय झाल्याची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : पणदूर मध्ये अलीकडेच झालेल्या तिरंगी ट्वेन्टी ट्वेन्टी भजन बारी मध्ये एकमेकांना अश्लील शेरेबाजी करण्याचा निषेधार्ह प्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर त्या तिन्ही भजनी बुवांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 6 महिने भजन बारी करण्यास जिल्हा भजनी कलाकार संस्थेच्या आणि भजन बारी आयोजकांच्या सहविचार सभेत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भजन हे हरिनाम स्मरण आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते.मात्र अलीकडेच झालेल्या तिरंगी भजनी सामन्यात भजनी बुवांनी अतिउत्साहाच्या भरात एकमेकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे भजनाच्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट लागण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा भजन मंडळाने घेतली. त्यासंदर्भात भजनी मंडळ सदस्य तसेच आयोजकांची सहविचार सभासुद्धा कणकवलीत घेण्यात आली. या सहविचार सभेत त्या तिन्ही बुवांना पुढील 6 महिने सिंधुदुर्गात भजन बारी करण्यास मनाई करण्यात आली तसेच तसे न केल्यास पणदूर मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल संस्था कायदेशीर कारवाई बाबत निर्णय घेईल असेही ठरल्याचे समजते. भजन कलेला समाज हिताचे आणि समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून संत परंपरा आहे. पणदूर मध्ये झालेल्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भजन मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे समाजात भजनप्रेमींकडून स्वागत होत असून अशा अतिउत्साही प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे.











