सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : ऑनलाईन सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम बँक खात्यामध्ये स्वीकारून ती अन्य खात्यांमध्ये वळविण्याच्या प्रकरणातील महिला आरोपी अश्वी जयस्वाल (वय २८, रा हावडा, पश्चिम बंगाल) हिचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावता आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यामुळे आरोपी अश्वि जैस्वाल हिला दिवाळी जेलमध्येच साजरी करावी लागणार आहे.
दोडामार्ग येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील उदय राजीव नाईक यांच्या खात्याच्या सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आणि पुढे हस्तांतरीत करण्यासाठी वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या खात्याशी संबंधित राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर देशातील विविध राज्यांतून ७७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या खात्यात ६ व ७ जानेवारी रोजी अनेक व्यवहार झाले असून एकूण १ कोटी १९ लाख ३ हजार ६३९ रुपयांची रक्कम जमा व खर्च झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी उदय नाईक, हनुमंत सावंत, अरुण ऊर्फ शिवा परब, अश्वी जयस्वाल, विराज सिंग आणि संजीवकुमार सिंग अशा सहा आरोपींना अटक केली आहे. तपासानुसार बँक खात्यांचा वापर करून फसवणुकीची रक्कम स्वीकारण्याच्या बदल्यात खातेधारकांना कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या व्यवहारांसाठी बैंक खात्यांच तपशील इंटरनेट बँकिगचे युजर आयडी व पासवर्ड तसेच सीमकार्ड अन्य आरोपीकडे देण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे.
आरोपीच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट कॉलिंग आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे आरोपींमधील परस्पर संपर्काचे पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत. अश्वी जयस्वाल हिला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती. तिचा सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल अशाच स्वरुपाच्या दुसऱ्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असून अन्य आरोपीचा शोध, तांत्रिक पुरावे गोळा करणे आणि सखोल तपास अद्याप सुरू आहे. आरोपीला जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. पोलिसांनी सादर केलेले म्हणणे आणि तपासाची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने अश्वी जयस्वाल हिचा जामीन अर्ज फेटाळला, दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.











