पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला
पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर शाखा अभियंत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार!
खारेपाटण (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील बसस्थानक ते घोडेपाथर या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री ना. नीतेश राणे यांनी संकेत शेट्ये यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली असून, या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटारलाइनचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी खारेपाटण येथील झुंजार मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सवाला भेट दिली असता कार्यक्रमस्थळी पायी चालत जाताना बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांनी नामदार नितेश राणेंकडे या रस्त्याचे डांबरी ऐवजी काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी तात्काळ तत्वतः ही मागणी मान्य करून लवकरच नव्याने रस्ता करून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर माजी सभापती बाळा जठार आणि संकेत शेट्ये यांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नीतेश राणे यांचे ओ एस डी दिलीप शेलार यांनी जिल्हा परिषदचे शाखा अभियंता गणेश कडुलकर यांच्यासमवेत खारेपाटण येथे भेट देऊन प्रस्तावित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी श्री. शेलार यांनी काँक्रीट रस्त्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. सदर रस्ता हॉटमिक्स काँक्रिट पद्धतीने विकसित करण्यासह दोन्ही बाजूंनी आवश्यक गटारलाइनची व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. दिवाळीनंतर तातडीने कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी माजी सभापती बाळा जठार, सुधीर कुबल,भाऊ राणे, संकेत शेट्ये, मंगेश गुरव,मधूशेठ गुरव, गोट्या कोळसुलकर,सुर्यकांत भालेकर, राजेंद्र वरुणकर, चेतन हुले, गणेश लव्हेकर, शेखर शिंदे , तुषार शिंदे, परवेझ पटेल आदी उपस्थित होते.
खारेपाटण बाजारपेठेतील हा रस्ता व्यापारी, ग्रामस्थ, प्रवासी तसेच वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. आता प्रत्यक्ष पाहणी आणि प्रशासकीय हालचाली सुरू झाल्याने खारेपाटणवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.











