डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग; नागरिकांतून समाधान व्यक्त
कणकवली (प्रतिनिधी) : शहरात डेंग्यू तापाच्या रुग्णांची वाढती शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० मध्ये डासनाशक धूरफवारणी करण्यात आली.
प्रभागातील नागरिकांना डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाचा त्रास होऊ नये तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा संभाव्य धोका कमी व्हावा, या उद्देशाने फॉगिंग मशीनच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रभागातील गटारे, सांडपाणी साचणारी ठिकाणे तसेच डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली.
पावसाळ्यानंतरच्या वातावरणात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता आणि डासनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देत आर्या औदुंबर राणे यांनी पुढाकार घेतल्याने प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
केवळ समस्या मांडण्यापेक्षा नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांच्या पुढाकाराचे समाधान व्यक्त केले जात आहे.











