कणकवली कॉलेजच्या करिअर कट्ट्या तर्फे ‘ऊर्जा बिझनेस’चे उत्साहात उद्घाटन; दिवाळी साहित्य खरेदीसाठी स्टॉल्स सज्ज

कणकवली (प्रतिनिधी) : आज शुक्रवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज, कणकवली येथील ‘करिअर कट्टा’ आयोजित ‘बिझनेस क्लब’ अंतर्गत ‘ऊर्जा बिझनेस’ उपक्रमाचे उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. पोस्ट ऑफिससमोरील प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त माननीय डेगवेकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे उपस्थित होते.

या उपक्रमासाठी प्राध्यापक लक्ष्मण राठोड यांनी बिझनेस क्लबमधील सर्व विद्यार्थ्यांकडून अतिशय मेहनत घेऊन उत्तम तयारी करून घेतली होती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा सुंदर व्यवसाय प्रकल्प प्रत्यक्षात आणला.

उद्घाटनासोहळ्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माननीय डेगवेकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होतो, असे सांगितले. प्राचार्य डॉ. युवराज महालिंगे यांनी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन केले. तसेच, प्रा.डॉ. बाळू राठोड आणि प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना व्यवसायातील नवनवीन तंत्रे, कौशल्ये आणि भविष्यातील संधींवर मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये असलेली ‘ऊर्जा’ ओळखून तिला योग्य व्यवसायाची जोड दिली, तर ‘ऊर्जा’ हा ब्रँड नक्कीच यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि कार्यक्षमता म्हणजेच खरी ऊर्जा असून, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव मिळणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक अविनाश पोरे, प्राध्यापक सत्यवान राणे तसेच प्राध्यापिका सुकन्या राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अविनाश पोरे यांनी करिअर कट्ट्याच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी बिझनेस क्लब कशा प्रकारे कार्यरत आहे यावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी स्टॉलला आवर्जून भेट देऊन दिवाळी साहित्याची खरेदी केली, तसेच विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद प्रयत्नांना मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह द्विगुणीत केला.

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि दिवाळी साहित्याचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार असून परिसरातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

error: Content is protected !!