कुडाळ (प्रतिनिधी) : वाघनखांच्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने कुडाळ बसस्थानक परिसरातील काळप नाका येथे सापळा रचून अटक केलेल्या तिन्ही आरोपींना कुडाळ न्यायालयाने दोन दिवस वनकोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपींकडून वन्यप्राण्यांचे दात, नखे आणि सोन्यात मढवलेले सुळे जप्त करण्यात आले होते. या कारवाईत वेंगुर्ला एसटी बसस्थानकातील शिपायाचाही समावेश आहे. तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.
रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४७, रा. कामतवाडी, वायंगणी, ता. वेंगुर्ला), विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे, ता. कुडाळ) आणि मुनाफ इस्माईल मुकादम (वय ४०, रा. अनपूर, विजयदुर्ग, ता. देवगड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
२ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ यांना वाघनखे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून वेंगुर्ला बसस्थानकात विक्री व्यवहाराची खातरजमा केली. त्यानंतर कुडाळ बसस्थानक परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून वन्यप्राण्यांचा एक दात, दोन नखे आणि सोन्यात मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले होते. अधिक तपास कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील करीत आहेत.











