कुडाळ शहरातील एटीएम फोडी प्रकरणातील आरोपी वारीस खान चा जामीन अर्ज तिसऱ्यांदा नामंजूर

सरकारी वकील ॲड. रूपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील साधना बाजार परिसरातील स्टेट बैंक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी वारीस जफरुद्दीन खान (वय २६. राहणार-राजस्थान) याचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी त्रिपाठी यांनी तिसऱ्यांदा फेटाळून लावला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. रूपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

११ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे चारच्या सुमारास कुडाळ येथील साधना बाजार परिसरातील एसबीआयच्या एटीएम मध्ये चोरी झाली होती. या गुन्ह्यात अनिल अम्मीलाल बलोदा याला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. वारीस खान याला पणदूर येथे ताब्यात घेण्यात आले. राजू आंबेकर यालाही अटक करण्यात आली होती, तर अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान वारीस खान याचा यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच यांच्याकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आता त्याने तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता. न्यायालयीन सुनावणीत वारीस खान याच्याविरुद्ध महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी जामिनावर सुटल्यास पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करण्याची तसेच फरार आरोपींच्या शोधात अडथळे निर्माण होण्याची शक्यता सरकार पक्षातर्फे न्यायालयात मांडण्यात आली. सरकार पक्षांचा युक्तिवाद आणि न्यायालयासमोर ओल्या अन्य बाबी यांचा विचार करून जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.

error: Content is protected !!