युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे : एम. पी. पाटील

मांगवली येथील ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावातच नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय सुरू करावा. मर्यादित जागेत मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब, योग्य आहार नियोजन आणि शास्त्रीय पशुपालनातून दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर करता येतो, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. पी. पाटील यांनी केले.
   
मांगवली (संसारेवाडी) येथील सुवर्णसिंधू गिर गोशाळेत आयोजित ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आत्मा, कृषी विभाग, पंचायत समिती व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
   
पाटील यांनी दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन, संतुलित आहार, दूध उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजना तसेच मुरघास निर्मिती व वापर याबाबत मार्गदर्शन केले. चाऱ्याची उपलब्धता, जनावरांचे आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन याकडे लक्ष दिल्यास दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळविता येते, असे त्यांनी सांगितले. दुग्ध व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या युवकांची उदाहरणेही त्यांनी दिली.
  
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, देवानंद पालांडे, आत्माचे अध्यक्ष मंगेश कदम, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. निमुणकर, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख आदी उपस्थित होते.
   
पशुधनाचे आरोग्य व विम्याचे महत्त्व या विषयावर डॉ. स्वप्नील आंबी यांनी मार्गदर्शन केले. जनावरांमधील आजार, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच पशुधन विम्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तर श्री. सकपाळ यांनी मनरेगा अंतर्गत चारा निर्मिती योजनेची माहिती दिली.मेळाव्यास अधिकारी, पदाधिकारी, पशुपालक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!