दोन दिवस पोलीस कोठडी
कणकवली (प्रतिनिधी) : विधवा महिलेला कारने लिफ्ट देऊन तिच्यावर त्याच कारमध्ये शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुरेश विठ्ठल खरात (४४, रा. सडेवागोटन, ता. देवगड) याला कणकवली पोलिसांनी मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अटक केली. त्याला आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ६ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. ही महिला नांदगावच्या दिशेने प्रवास करत असताना, संशयित आरोपी सुरेश खरात याने तिला आपल्या कारमध्ये घेतले. त्यानंतर नांदगावच्या अलीकडे काही अंतरावर कार थांबवून त्याने कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची कणकवली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली.
पोलीस पथकाने तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपी सुरेश खरात याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने ६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस अधिकारी वृषाली बर्गे करत आहेत.











