सिंधुदुर्ग एलसीबी ची दमदार कामगिरी
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओसरगाव-गवळवाडी येथे तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम लाईट केबलची चोरी झाल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना चोरीस गेलेल्या पाच बंडल केबलसह ताब्यात घेण्यात आले आहे. इरशाद खुर्शीद खान (वय ३२, राजस्थान), आरिफ खुर्शीद खान (वय ३०) आणि शाहीद खुर्शीद खान (वय २४, दोघे रा.हरियाणा) अशी त्यांची नावे आहेत, त्यांना पुढील तपासासाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग कडून देण्यात आली
एलसीबी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओसरगाव येथील गवळवाडी परिसरात ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० या कालावधीत ही चोरी झाली होती. चोरट्यांनी पॅकिंगसह अॅल्युमिनियम लाईट केबलची एकूण पाच बंडले चोरून नेली होती. या मालाची किंमत ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या तपासात इरशाद खुर्शीद खान (रा. हमिर्राका, ता. तिजारा, जि. अलवर, राजस्थान), आरिफ खुर्शीद खान आणि शाहीद खुर्शीद खान (दोघेही रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) या तिघांना त्यांच्या ताब्यातील वाहनांसह आणि चोरीस गेलेल्या केबलच्या मालासह ५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि पोलीस शिपाई अमर कांडर यांचा समावेश होता.











