खारेपाटण विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या आनंदाची झळाळी; पं स सदस्य राजेश जाधव , वारगाव सरपंच नाना शेटे यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण
खारेपाटण (प्रतिनिधी) : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, या सामाजिक भावनेतून खारेपाटण येथील युवा उद्योजक सतीश गुरव यांच्यावतीने खारेपाटण विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी भेटवस्तू वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
खारेपाटण विभागातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्य असलेल्या तब्बल १०० ज्येष्ठ नागरिकांना यावेळी दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तू किटमध्ये उटणे, साबण, तेल, मेणबत्त्या आदी दैनंदिन वापरातील तसेच दिवाळी सणासाठी आवश्यक साहित्याचा समावेश होता. एकूण १०० किट तयार करून त्यांचे ज्येष्ठ नागरिकांना वितरण करण्यात आले.
पंचायत समिती सदस्य राजेश जाधव आणि वारगावचे सरपंच नाना शेटे यांच्या हस्ते या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. दिवाळीच्या मंगलमय पर्वात ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सण-उत्सव केवळ स्वतःच्या आनंदापुरते मर्यादित न ठेवता समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न युवा उद्योजक सतीश गुरव यांनी या उपक्रमातून केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पाटणकर, सदस्य सुधीर कुबल भाजपा शक्ती केंद्रप्रमुख शहर सूर्यकांत भालेकर ,शक्ती केंद्रप्रमुख ग्रामीण भाऊ राणे, झुंजार मित्र मंडळचे सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.











