कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

जिल्हाप्रमुख वैभव नाईक,विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, नीलम पालव यांची प्रमुख उपस्थिती

बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आवश्यक-वैभव नाईक

स्मृतिदिनानिमित्त पुढील पंधरवड्यात भगवा सप्ताह, ६३ गावांत गावभेट दौरे – सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज कणकवली येथील शिवसेना शाखेत साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आक्रमकपणे संघर्ष करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुकाप्रमुख राजू राठोड यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ. वैभव नाईक म्हणाले, मराठी माणसाला महाराष्ट्रात न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. स्वतः सत्तेच्या पदांपासून दूर राहून देशाच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्याला विविध पदांवर काम करण्याची संधी देणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक शिवसैनिकासाठी अभिमानास्पद आहे. सत्ता असो अथवा नसो, कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करत राहिले पाहिजे, ही शिकवण बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिली आहे. आज सत्ता नसतानाही बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करणारे असंख्य शिवसैनिक आहेत, हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. केवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांचे विचार जोपासले जात नाहीत, तर त्यांचे विचार आत्मसात करून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आवश्यक आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले.

मध्यंतरीच्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेला काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आजच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. यासाठी विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे वैभव नाईक यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार, विकास आणि सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्याच त्याच कामांची पुनरावृत्ती करण्यापेक्षा जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. पंधरा वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन भगवा फडकवत जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला, त्याच ताकदीने पुन्हा एकदा संघटित होऊन काम करण्याचे आवाहन वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना केले.

कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रमांची माहिती देताना तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. सुशांत नाईक म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली तालुक्यात नव्या जोमाने संघटनात्मक कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील पंधरवड्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून तालुक्यातील ६३ गावांमध्ये तालुकाप्रमुखांचे गावभेट दौरे आयोजित केले जाणार आहेत. या दौऱ्यांदरम्यान जुन्या शिवसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून, संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे.त्यानंतर जिल्हाप्रमुख मा. आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावागावांत बैठका घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क वाढवून संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.

कणकवली तालुक्यात आगामी काळात “भव्य शिवसैनिक मेळाव्याचे” आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. ‘गाव तिथे शिवसेना, शिवसेना तिथे गाव’ या संकल्पनेतून प्रत्येक गावात शिवसेनेची संघटना सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी गावभेट दौरे, भगवा सप्ताह, गाव बैठका आणि शिवसैनिक मेळावा या उपक्रमांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले.

याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुकाप्रमुख राजू राठोड, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, विभागप्रमुख विलास गुडेकर, बबली राणे, गुरु पेडणेकर, ओमप्रकाश ताम्हाणेकर, रवींद्र खंदारे, तात्या निकम, सिद्धेश राणे, राजू राणे, रुपेश आमडोसकर,ॲड. हर्षद गावडे, रोहित राणे, तेजस राणे, संतोष परब, अनंत राणे, महादेव राठवड, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, शोभा बागवे, ललित घाडीगावकर, लवू पवार, विठोबा मर्ये, दया मेस्त्री, सुरेंद्र पाटकर, दिवाकर पारकर, प्रमोद सावंत, आनंद महाडेश्वर, महेश मोर, उमेश मोर, आसिफ मुजावर, फय्याज खान, संतोष राणे, दिवाकर परब, सुरेश रासम, प्रकाश शिंदे, आप्पा तावडे, अनिल नरे, आत्माराम घाडी, गोपाळ लोके, नरेश दळवी, संतोष तेली, चंदू परब, मोहन तांबे, नितेश राणे, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!